सांगोला मतदार संघात आव्वाज कुणाचा .?.सध्या तरी शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा असला तरी तगडी फाईट होणार..
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढतीमुळे राजकीय समीकरणे बदलली असून मत विभाजनाचा फायदा कोणाला होतो यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी शेकापचे डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांना मतदारसंघात सर्वच ठिकाणी निघालेल्या पदयात्रेस,जाहीर सभेत भरभरून प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून येते. शेकापचा मतदार संघातील आपल्या ताकदीवर विश्वास असून कार्यकर्त्याच्या बळावर विजय निश्चित असल्याचे बोलले जात असले तरी आम.शहाजीबापू पाटील व मा.आ.दीपकआबा साळुंखे पाटील यांनीही मतदारसंघात तगडे आव्हान निर्माण केल्यामुळे निवडणुकीत चुरस आहे. सांगोला विधानसभेची निवडणुक आता ऐन रंगात आली आहे. प्रचाराचा धुरळा उडालाय.उमेदवार रात्रीचा दिवस करून मतदारांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत अनेक ठिकाणी पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत कोण आपला पण परका हे सध्या तरी समजत नसल्याचे दिसून येते आहे, काही उमेदवार रात्री, अपरात्री मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत,सांगोला शहरात नेते , कार्यकर्ते एका रात्रीत पक्ष बदलत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एका रात्रीत असे काय घडते की पक्षप्रवेश करून घेतला जातो हे न उमगणारे कोडे आहे, पक्षप्रवेश करताना विचारधारेला महत्त्व न देता साक्षात्कार होऊन नवा झेंडा नवे पक्षाचे धोरण हाती घेऊन देवदेवतांच्या साक्षीने आणाभाका घेऊन सर्व काही सुरळीत सुरू आहे, सध्या या पक्षातून त्या पक्षात जाणे सोयीस्कर झाले आहे, " पैसा फेको तमाशा देखो ; असे असले तरीही जनता मात्र अशा पक्ष बदलूना थारा देणार नसल्याचे बोलले जात आहे.
सध्या उमेदवारांचा एक गठ्ठा मतदारावर डोळा असला तरी मतदारही बेरकी झाले आहेत, एका घरात दोन किमान तीन पक्ष असल्याचे दिसून येते मतदार सध्या कोणात्याही उमेदवारास दुखावण्याच्या परिस्थितीत नाही, तर गेल्या आठ दिवसापासून गल्ली, वाडीवस्ती सह ग्रामीण, शहरी भागात जेवणावळी सुरू असून ढाबेही हाउसफुल असल्याने सर्वच उमेदवाराकडून मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
निवडणुकीत उभे असलेले सर्वच उमेदवार विकास कामावर बोलत आहेत हे करीत असताना चंद्र देऊ, सूर्य देऊ असे न म्हणता फक्त मोठमोठी आश्वासने देऊन बोळवण करीत असल्याचे दिसून येते, तर नेत्यांनी आपणास झेपेल तेवढीच आश्वासने द्यावीत असेही बोलले जात आहे.
मतदार राजा सुज्ञ आहे सध्या कोण कोणत्या पक्षात आहे व पुढे कोण काय करणार यावर विश्वास ठेवून त्याच उमेदवारास निवडून देण्याची शक्यता आहे, विकास कामे ..विकास कामे म्हणजे काय रे भाऊ तर कोणत्याही व्यक्तीच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा यासह रस्ते,लाईट,आरोग्य व हातास काम हे मूळ मुद्दे आहेत वाढती महागाई व शेतकऱ्यांच्या उत्पादित मालास योग्य भाव मिळावा एवढीच अपेक्षा असते,तरीही हे प्रश्न सुटत नाहीत,विद्यमान आमदारांनी विकास कामाचा डांगोरा पिटला आहे, यां पावणे पाच वर्षाच्या काळात आता जे एकमेका विरूद्ध निवडणूक लढवीत आहेत ते दोघे एकत्रच होते, पैरेकरी होते आणि जनतेच्या साक्षीने विकास कामे...विकास कामे म्हणून उर बडवून घेत होते , हेचं नेते गेल्या आमदारकी वेळी सहकार्य केलेले व सध्या विरोधात उभे असलेले आता मात्र टक्केवारीचे आरोप करीत आहेत हे सर्व थोतांड असल्याचे बोलले जात आहे.त्यामूळे जनतेस हसावे की रडावे असे वाटत असल्याची चर्चा आहे पण याचं विकास कामामुळे विद्यमान आमदारांचे सच्चे कार्यकर्ते दुरावले असल्याचे चित्र आहे तसेच गेल्या ५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांचे विरोधकही वाढले आहेत. त्यामूळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शेकापची ताकत पाहता भाकरी फिरवून डॉ.बाबासाहेब देशमुख यांनाच नक्की आमदार करतील असे राजकिय जाणकारातून बोलले जात आहे.
प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले असून प्रत्यक्ष प्रचारात शेतकरी कामगार पक्षाने आघाडी घेतली असून धनशक्ती विरुद्ध जनशक्ति अशा होणाऱ्या लढतीत सध्या तरी शेकापचेच पारडे जड असले तरी राजकिय अनुभव असलेल्या दोन विरोधी तुल्यबळ उमेदवारामुळे विजयाचे पारडे दोलायमान अवस्थेत आहे.


Post a Comment
0 Comments