*महिलांनी तक्रारी अर्ज दिला असून चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील - पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे
सांगोला (प्रतिनिधि ) महूद ता सांगोला येथील जय हिंद महिला बचत गटासह विविध २२ बोगस बचत गटाच्या माध्यमातून आकर्षक परतावा, दामदुप्पट रक्कमेचे आमीष दाखवून पती - पत्नीने संगनमताने शेकडो गोर गरीब महिलांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सुरेखा लवटे, जयश्री बेहेरे ,ज्योती पळसे ,द्रोपदा नागणे, सविता इरकर, अश्विनी नागणे,अलका मोटे, मिनाक्षी कांबळे आदी महिलांनी पोलीस निरीक्षक सांगोला यांचेकडे लेखी तक्रार दिली आहे. सदर अर्ज महिलांनी दिला असून त्याची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्या वर गुन्हे दाखल करण्यात येतील असे पोलीस निरीक्षक भीमराव खनदाळे यांनी सांगितले.
महूद येथील शाहीर करीम मुलाणी व यास्मिन शाहीर मुलाणी पती पत्नीने शेकडो गरीब महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एकत्र केले. सन २००८ साली जय हिंद महिला बचत गटाच्या नावाने बँक खाते उघडले व त्यानंतर भारतीय महिला स्वयंसहायता बचत गट, महाराष्ट्र जिंदाबाद स्वयंसहायता बचत गट, जय भारत माता स्वयं सहायता बचत गट, तिरंगा स्वयंसहायता बचत गट यासह अनेक बोगस गट वेगवेगळ्या नावाने स्थापन केले. गुंतवणूकदार महिला पुरुष यांचा विश्वास संपादन करून भांडवल गटावर एक रकमी रक्कम भरल्यास त्यास दामदुप्पट व बचत गटात पाच वर्षे पैसे भरल्यानंतर दामदुप्पट रक्कम अशी व्याज व परताव्याची वेगवेगळी आमिषे दाखवून कोट्यावधी रुपये जमा केले. यामध्ये केवळ एकाच बचत गटाच्या बँक खात्यावर आर्थिक व्यवहार दाखविले गेले उर्वरित बचत गटांची बँकेत खातीच उघडली नाहीत तर बचत गटाचे प्रोसेडिंग,मिटींग अहवाल , ठरावाची कोणत्याही प्रकारे दप्तर अद्यावत ठेवले नाही. केवळ महिलांकडून भांडवल गट व मासिक बचत गटाच्या माध्यमातून मोठ मोठ्या रकमा गोळा केल्या दरम्यान महिलांनी आपले पैसे दाम दुप्पट झाल्यानंतर पती-पत्नीकडे पैसे मागण्यासाठी गेल्यावर त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे देऊन पैसे देण्याचे टाळले व पुन्हा पैसे मागायला आला तर तुमच्यावर सावकारी गुन्हे दाखल करू तसेच तुमच्या पतीवर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल अशी धमकी जय हिंद महिला बचत गटाच्या अध्यक्षा यास्मिन शाहीर मुलाणी यांनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Post a Comment
0 Comments