संतोष राऊत हे शिराळा पंचायत समिती येथे ऑगस्ट २०२१ ते सप्टेंबर २०२४ या काळात कार्यरत होते. तसेच त्यापूर्वी ते पंचायत समिती, सांगोला, जि. सोलापूर,(मे २०१८ ते ऑगस्ट २०२१) पंचायत समिती, उदगीर, जि. लातूर ( सप्टेंबर २०१५ ते मे २०१८) येथेही गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी केलेल्या अत्युत्कृष्ट कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना गुणवंत अधिकारी पुरस्कार ऑगस्ट २०२४ मध्येच जाहीर केला. सदर पुरस्काराचे वितरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
राऊत यांनी शिराळा पंचायत समिती मध्ये कार्यरत असताना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, १५ वा वित्त आयोग, जन सुविधा योजना, नागरी सुविधा योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास इ. योजनेत उत्कृष्ट कामकाज केले होते. घरकुल योजनेत अनेक पुरस्कार त्यांनी पंचायत समितीला मिळवून दिले होते. तसेच यशवंत पंचायतराज अभियानात सलग तीन वर्षे शिराळा पंचायत समिती ही पुणे विभागात अग्रेसर ठेवण्यात त्यांनी यश मिळवले होते. यशवंत पंचायतराज अभियानात पंचायत समितीने राज्यात सुद्धा तृतीय क्रमांक मिळवला होता. त्यांनी पंचायत समितीला आय एस ओ मानांकन मिळवून दिले तसेच अभिलेख वर्गीकरणात सुद्धा उत्कृष्ट कामकाज केले होते. पंचायत समिती मध्ये वृक्षारोपण व लॉन करून पंचायत समितीचा परिसर आकर्षक करण्यात त्यांनी मोलाचा हातभार लावला होता.
तसेच पंचायत समिती, सांगोला, जि. सोलापूर येथे कार्यरत असताना त्यांनी कोव्हिड कालावधीत आरोग्य विभागाचे उत्कृष्ट नियोजन करून कोव्हिड परिस्थितीवर मात करण्यात मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट या पॅटर्नची चर्चा त्यावेळी महाराष्ट्राभर झाली होती. तसेच सन २०१९ मध्ये टँकर चे उत्कृष्ट नियोजन करून त्यांनी सांगोल्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यात यश मिळवले होते. सांगोला मध्ये सुद्धा आवास योजना व इतर सर्व शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सांगोला पंचायत समितीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यात त्यांनी यश मिळवले होते. त्यापूर्वी उदगीर, जि. लातूर येथे कार्यरत असताना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उदगीर तालुका ओडीएफ करण्यात त्यांनी यश मिळवले. तसेच सन २०१६ च्या दुष्काळी परिस्थितीत टँकरचे प्रभावी नियोजन केले होते.
जनतेप्रति संवेदनशीलता असणारा व सामान्य कटुंबातून पुढे आलेला एक प्रशासकीय अधिकारी किती उत्कृष्टपणे कामकाज करू शकतो, हे राऊत यांनी आपल्या कृतीतून व मागील १० वर्षाच्या कामकाजातून दाखवून दिले आहे. त्यामुळेच त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
संतोष राऊत हे पदोन्नती नंतर सध्या सहाय्यक आयुक्त (चौकशी) या पदावर विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे कार्यरत आहेत. त्यांनी लवकरात लवकर पश्चिम महाराष्ट्रात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदलून यावे, अशी अपेक्षा अधिकारी व कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे. सर्वांना सोबत घेऊन सकारात्मक कामकाज करणारा अधिकारी अशी ओळख संतोष राऊत यांनी निर्माण केली आहे, हेच यातून दिसून येते.


Post a Comment
0 Comments