Type Here to Get Search Results !

* सांगोला मतदार संघात तिरंगी हाय व्होल्टेज लढत..

आ. शहाजी बापू पाटील, मा.आ. दीपक आबा साळुंखे पाटील दोघे मुरब्बी राजकारणी...तर शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख नवखे असले तरी करेक्ट कार्यक्रम करणार का ?..


सांगोला (विशेष प्रतिनिधी) सांगोला मतदारसंघात 
विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील, शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख व शिवसेना उबाठाचे दीपकआबा साळुंखे पाटील यांच्यात हायव्होल्टेज लढत होत आहे. याठिकाणी महायुती, महाविकास आघाडीतील दोन पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असल्याने
तिरंगी लढत होत असल्याने जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळणार असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे टारगेट आमदार शहाजीबापू पाटील असल्याने निवडणुकीतील रंगत वाढणार आहे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचाराला सांगोला येथे येणार असल्याने ही लढत हाय व्होल्टेज होणार असल्याचे दिसून येते. तर शेकापमधे डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख या दोन बंधूत दिलजमाई झाल्याने कार्यकर्त्यात उत्साह संचारला आहे.
       २०१९ विधानसभा निवडणुकीत शहाजीबापू पाटील व शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख यांच्यात चुरशीने झालेल्या लढतीत शहाजी पाटील यांनी बाजी मारली होती त्यावेळी दिपकआबा साळुंखे पाटील यांनी अर्ज भरूनही माघार घेत शहाजी पाटील यांना पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय सुकर झाला होता. आबांचे कार्यकर्ते गेली ५ वर्ष अनेक ठिकाणी आमच्यामुळेच शहाजीबापू निवडूण आल्याचे सतत बजावत होते मागील आठवड्यात शिवसेनेचा एबी फॉर्म आणल्यानंतर आ. शहाजीबापू पाटील यांच्या होम ग्राउंडवर चीक महुद येथे झालेल्या जाहीर सभेत शहाजी बापूंनी मागील  निवडणुकीत तुमचा फक्त हातभार लागला असे म्हणून तुमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांमुळे माझा विजय झाला त्यास तुम्ही एकटे कारणीभूत नाही असे बजावले होते व माझ्यावर टीका करणाऱ्यांचा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर  हिशोब चुकता करू असे सांगून केलेल्या विकास कामांच्या जोरावर माझा विजय निश्चित असल्याचे सांगितले. आ.शहाजी बापू पाटील व दिपकआबा साळुंखे पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपआपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.दोघांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे.आ.शहाजी पाटील यांनी शिंदे गटात गेल्याने त्याचा राग उध्दव ठाकरे गटास आहे त्यामुळे ठाकरे गटाने दिपकआबा साळुंखे पाटील यांना प्रवेश देऊन  राज्यांतील महा विकास आघाडीच्या नेत्यांचा विचार न करता लगेच सांगोला मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे.ठाकरे गटाकडून प्रचारात कोणतीही कसर सोडली जाणार नाही असे दिसून येत आहे प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात आरोप प्रत्यारोप शिगेला जाणार असल्याचे दिसून येते.आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधकांनी कितीही रान उठवले तरी मागील सहा विधानसभा निवडणुकीपासून सांगोला मतदार संघावर त्यांचा प्रभाव कायम ठेवण्यात ते यशस्वी झालेले आहेत त्यामुळे  त्यांचा निवडणुकीतील आत्मविश्वास वाढला आहे.
     सांगोला मतदारसंघ महा विकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचा हक्काचा मतदारसंघ असतानाही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागील वेळी शिवसेनेचा उमेदवार विजयी झाल्याने या ठिकाणी आम्हीच लढणार असे सांगून आपला उमेदवार जाहीर केला त्यामुळे महाविकास आघाडीतील दोन घटक पक्ष मतदारसंघावर दावा करीत असल्याने आघाडीत बिघाडी झाली आहे. काही अंशी अशीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. शेकापने महाविकास आघाडीचा नेहमी धर्म पाळला असून लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार करून त्यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सहकारात राजकारण नको म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा मध्यवर्ती बँक ,दूध संघ व इतर ठिकाणी खा.शरद पवार व विजयसिंह मोहिते पाटील, मा.आ. प्रशांत परिचारक यांच्या विचाराच्या आघाडीत सक्रिय सहभागी असतो, शेतकरी कामगार पक्ष या आघाडीत आपले उपद्रव मूल्य कधीही दाखवत नाही त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सहकारातील ही मातब्बर मंडळी शेकापला निश्चित मदत करतील असे बोलले जात आहे. दिवंगत गणपतराव देशमुख यांनी मतदारसंघात केलेल्या भरीव कामामुळे निवडणुकीत शेकापला कोणतीही अडचण येणार नाही असे असले तरी अनुभवी नेत्यांनी पक्षातील नाराज कार्यकर्त्यांना आपलेसे करावे लागणार आहे शेकापक्षाची मोठी ताकद असली तरी शेकापक्षाला शेकापक्षच पराभूत करू शकतो ,एकसंघ शेकापला कोणीही हरवू शकत नाही,गाफील न राहता आत्मविश्वासाने सामोरे गेल्यास पक्षाला कोणतीही अडचण येणार नाही.सध्या मतदारसंघात विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील, मा.आ. दिपकआबा साळुंखे पाटील हे दोन कसलेले राजकारणी तर शेकापचे उमेदवार डॉ बाबासाहेब देशमुख हे राजकारणात नवखे असल्याने निवडणुकीत सर्वांना समान संधी असल्याची चर्चा आहे असे असले तरी ४ नोव्हेंबर नंतर मतदार संघात प्रत्यक्ष किती उमेदवार निवडणुक रिंगणात राहतात यावर निवडणुकीची पुढील रणनीती ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments