.. निवडणुकीच्या तोंडावर विरोधकावर कुरघोडी करण्याचा केविलवाना प्रयत्न..
सांगोला (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर सांगोला मतदार संघात सर्वच पक्षांनी राजकीय हालचाली वाढवल्या आहेत. तर सर्वच पक्षात आयाराम गयारामची चलती सुरू असल्याने कार्यकर्त्यांना मात्र", विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती; असे वाटत असेल त्यात वावगे काही नाही,सध्या कार्यकर्ते सैरभैर झाल्याचे दिसून येते त्यामुळे नेमकं कोण कोणत्या पक्षात हे समजेनासे झाले आहे. निवडणूक लढविणे हे येऱ्या गबाळ्याचे काम नाही.., ज्याच्याकडे माल आहे त्याच्याकडे ताल आहे, पक्षांतरामुळे वातावरण निर्मिती होते परंतु त्याचे रूपांतर मतामध्ये होते का याचे चित्र निवडणुकीनंतरच दिसून येणार आहे. सर्वसामान्य जनता मात्र हे उघड्या डोळ्यांनी पहात आहे.
दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघात फोडाफोडीचं राजकारण, नेत्यांकडून या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात अशा उड्या मारणं सुरू झालं आहे. तालुक्यात सध्या आयाराम – गयारामांची (पक्षांतर करणारे पुढारी, कार्यकर्ते) चर्चा होत आहे. मुळात आयाराम – गयाराम ही संज्ञा वापरण्यास हरियाणातूनच सुरुवात झाली होती. राज्यात सर्व पक्षात हे चित्र अजूनही कायम आहे. अलीकडच्या काळात नेत्यांचं , कार्यकर्त्यांचे पक्षांतर करण्याचं प्रमाण वाढलं आहे. फार कमी नेते एकाच पक्षात अनेक वर्षे टिकून असल्याचं पाहायला मिळत आहेत. हे नेते,कार्यकर्ते आपली मूळ विचारधारा, पक्षाची विचारधारा, आजवर केलेलं राजकारण या सर्व गोष्टी बाजूला ठेवून पक्ष बदलत असल्याचे दिसून येते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इन्कमिंग-आऊटगोईंग जोरात सुरू असून असंतुष्ट, नाराजांना हाताशी धरून आयाराम-गयाराम यांना ऊत आला आहे. विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आणि तिकीट मिळवण्यासाठी नेते कारणांचा शोध घेत आहेत अशावेळी नेत्याची मर्जी राखण्यासाठी कार्यकर्त्यांना नेत्याच्या मागे फरपटत जाण्याशिवाय पर्याय नाही असे दिसून येत आहे.तर निवडणुकीच्या तोंडावर गेल्या काही दिवसात, अमुक अमुक पक्षाला धक्का, तमुक पक्षाला खिंडार यामुळे कोणता कार्यकर्ता कोणत्या पक्षात या बाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. पक्षांतरामुळे वातावरण निर्मिती होते परंतु त्याचे खरेच मतांमध्ये रूपांतर होते का हे मात्र येत्या २३ तारखेला समजणार आहे.

Post a Comment
0 Comments